18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक पार पडली असून सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता . ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिले. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीचे के. सुरेश यांच्याशी सामना करावा लागला. .पण आवश्यक संख्याबळ नसल्याने के सुरेश यांचा पराभव झाला.
लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना ओम बिर्ला म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार बनले आहे. गेल्या दशकात जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे.
ओम बिर्ला पुढे म्हणाले, ”१८ वी लोकसभा इतर आव्हाने असतानाही, 64 कोटींहून अधिक मतदारांनी मोठ्या उत्साहाने निवडणुकीत भाग घेतला. सभागृहाच्या वतीने मी त्यांचे आणि देशातील जनतेचे आभार मानतो. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निःपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल आणि दुर्गम भागात मतदान व्हावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल निवडणूक आयोगाचे देखील मी आभार मानतो.देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही साधनांची जबाबदारी आहे.”
लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात होते. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण आहे. तसेच भाजपमधील सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.