जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील गंडोहच्या जंगल परिसरात बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. परिसरात सध्या सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. गेल्या काही दोवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी दहशतवाद्यांविरुद्धची लढाई ही अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी 11 जून रोजी चत्तरगल्ला येथील संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते, तर दुसऱ्या दिवशी गंडोह भागातील कोटा टॉप येथे दहशतवाद्यांशी झालेल्या गोळीबारात एक पोलीस जखमी झाला होता.
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील जंगल परिसरात संशयास्पद हालचाली सुरू झाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी, सुरक्षा दलांनी सर्व आत जाणारे आणि जाण्याचे मार्ग बंद केले आहेत. कांडा-पोनी परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. रियासी हा तोच भाग आहे जिथे ९ जून रोजी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. गोळीबारानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. या काळात ९ जणांचा मृत्यू झाला होता तर ४१ जण जखमी झाले होते.