अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सुरू असणारी टी २० वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना पार पडला. हा सामना रोमहर्षक होईल असे प्रेक्षकांना वाटत होते. याचे कारण म्हणजे बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानच्या संघाने दिलेली लढत. मात्र आजचा सेमीफायनाचा सामना हा अवघ्या दोन तासांमध्ये संपला. तसेच आजच्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली आहे.
भारतीय वेळेनुसार आज सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सेमीफायनलचा सामना त्रिनिनाद येथे सुरू झाला. या पहिल्या सेमीफायनलमध्ये साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला. सुरुवातीला फलंदाजी करताना अफगाणिस्तानला केवळ ५६ धावायचं करता आल्या. त्यांचा संघ १२ ओव्हर्समध्येच बाद झाला. त्यानंतर साऊथ आफ्रिकेने केवळ एक विकेट गमावत अफगाणिस्तानला नमवून फायनलमध्ये धडक मारली आहे.