सध्या राज्यात अनेक भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भ आणि काही भाग सोडत संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. त्यात सर्वाधिक मुसळधार पाऊस हा कोकण भागात सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टीवर अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची सतत बॅटिंग सुरूच आहे. कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट देखील देण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रात्रभर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. सध्या पावसाची सगळीकडे संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला मुसलढाव पावसाने झोडपून काढले आहे.
पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच समुद्र सध्या खवळलेला असून, खलाशांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा, ठाणे आणि मुंबईत देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.