लोकसभेच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सदस्यांना संबोधित केले. आजच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील जनतेने तिसऱ्यांदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिले आहे. जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी सर्वाधिक मतदान केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन देखील आपल्या अभिभाषणात केले.
लोकसभेच्या अधिवेशनाबरोबरच आजपासून राज्यसभेचे अधिवेशन देखील सुरु होणार आहे. राष्ट्र्पतींनींनी अभिभाषणाच्या सुरुवातीला सर्व नवनिर्वाचित सदस्यांच अभिनंदन केले. आपल्या अभिभाषणात बोलताना राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू म्हणाल्या, ”ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. ६४ कोटी मतदारांनी मोठ्या उत्साहाने आपले कर्तव्य निभावले. यावेळीही देखील महिलांनी सर्वाधिक मतदान केले. या निवडणुकीतून जम्मू काश्मीरमधून चांगले परिणाम समोर आले आहेत. काश्मीर खोऱ्यात यंदा गेल्या कित्येक वर्षातील मतदानाचे रेकॉर्ड तुटले आहेत.”
तसेच पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ”संपूर्ण जग भारतात झालेल्या निवडणुकीची चर्चा करत आहे. देशात ६० वर्षानंतर एकच सरकार सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेत आले आहे. जनतेने या सरकारवर विश्वास दाखवला आहे. १८ वी लोकसभा ही अनेक घटनांमुळे ऐतिहासिक बनली आहे. ही लोकसभा संविधानाला ५६ वर्षे पूर्ण होताना साक्षी असणार आहे.”