पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंडचा प्रवास रोमांचक असू शकतो, पण सुरक्षित प्रवासासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हणत मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन करून सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्तराखंडच्या सहलीला निघण्यापूर्वी, हवामानाचे तपशील जाणून घ्या आणि सावधगिरी बाळगा असेही या आवाहनामध्ये म्हंटले आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविक आणि इतर पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही अपेक्षित आहे. विशेषत: डेहराडून, नैनिताल, चमोली, पिथौरागढ, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची आणि नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रवासादरम्यान रस्त्यांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने लोकांना हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करणे अनिवार्य असल्यास, प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा आणि केवळ सुरक्षित ठिकाणीच रहा असे सांगितले आहे.
डेहराडून येथील हवामान केंद्राचे संचालक डॉ.बिक्रम सिंह यांनी सांगितले की, ३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, 28-29 जून रोजी उत्तराखंडच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. डोंगरावर जाणाऱ्या लोकांना त्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पावसाळ्यात कोणत्याही नदी-नाल्यांजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.