कालपासून सुरु झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात सरकार विविध घोषणा करण्याची शक्यता आहे.अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील.आज दुपारी २ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.महायुती सरकार शेतकरी, महिला, तरुणांना आकर्षित करण्यासाठी या अर्थसंकल्पांत भरीव तरतूद करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकार बेरोजगार तरुणांसाठी प्रतिमहिना 5 हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यसरकार यावेळी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार आर्थिक दुर्बल महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठीही मोठी आणि भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चालू आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या तरतुदी करेल असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण, युवा कौशल्य, अन्नपूर्णा योजना अशा महत्वााचा योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. ह्या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसोबतच जनतेचे लक्षही या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.