यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली आहे. लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे. त्याआधी कोकणातील अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी राणेंनी केली आहे पत्रादेवी ते राजापूर या भागाचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणीही राणेंनी गडकरींना केली आहे. दरम्यान गेली कित्येक वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम रखडलेले आहे. काही ठिकाणी झालेली कामे ही नित्कृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले होते.
नारायण राणे यांनी खासदार झाल्यानंतर जातीने मुंबई -गोवा महामार्गाच्या बाबतीत लक्ष घातलेले पाहायला मिळत आहे. ७ सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाला कोकणात खास महत्व आहे. त्यामुळे लाखो चाकरमानी हे कोकणात येत असतात. त्यानं प्रवासाच्या वेळेस त्रास होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची विनंती राणेंनी गडकरींना केली आहे.
https://x.com/MeNarayanRane/status/1806352813498458139/photo/1
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून नारायण राणे हे ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव करून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मोदी सरकारच्या मागच्या टर्ममध्ये राणे हे कॅबिनेट मंत्री होते. तर यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोकणच्या विकासावर लक्ष देणार असल्याचे राणेंनी सांगितले होते. त्यानुसार नारायण राणे कामाला लागलेले दिसत आहे. तसेच सर्वात प्रथम त्यांनी कोकणातील सर्वात महत्वाचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा हायवेच्या कामासंदर्भात लक्ष घातले आहे.