काल भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा सेमीफायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताणें २०२२ मधील फायनलचे उट्टे फेडले आहे. इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत करून भारताने दिमाखत टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता २९ जून म्हणजेच उद्या बार्बाडोस येथे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्याचा अंतिम सामना हा ८ वाजता सुरू होणार आहे.
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला कर्णधार जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट यांनी चांगली सुरुवात करून दिली. विशेषत: बटलर आक्रमक शैलीत फलंदाजी करत होता, अर्शदीपच्या संथ चेंडूंवरही बटलरने तीन चौकार मारले. इंग्लंड उत्कृष्ट धावगतीने ८ च्या वर धावगती ठेवून धावा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे २०२२ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती भारतीय चाहत्यांमध्ये निर्माण झाली. मात्र पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अक्षर पटेलने संधीचा फायदा घेत बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला पहिले यश मिळवून दिले.
अक्षरच्या पहिल्याच चेंडूवर बटलर रिव्हर्स स्वीप करायला गेला आणि चेंडू बॅटला लागून थेट यष्टीमागे ऋषभ पंतच्या हातात गेला. बटलरने 15 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या, त्यानंतर जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात 34 धावांच्या एकूण धावसंख्येवर सॉल्टला बाद केले. सॉल्टने 5 धावा केल्या. त्यानंतर सातत्याने एका पाठोपाठ इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने २० ओव्हर्समध्ये १७१ धावांचा डोंगर उभा केला. मध्येच पाऊस आल्याने खेळ काही काळ थांबलेला होता. मात्र त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 3, रीस टोपली, जोफ्रा आर्चर, सॅम कुरन आणि आदिल रशीदने प्रत्येकी 1 बळी घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ICC T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला आहे.