गेले २ दिवस मुंबई आणि उपनगरासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, उपनगर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आज अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई व उपनगरांत येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रविवार, ९ जून रोजी मान्सूनने मुंबईत दमदार एन्ट्री केल्यानंतर संपूर्ण जून महिना मुंबईकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. अधूनमधून पावसाळी वातावरण निर्माण करून रिपरिप करीत अचानक गायब होणाऱ्या पावसाने गेले काही दिवस मुंबईला हुलकावणी दिली होती. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने चांगलेच त्रस्त झाले होते. मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते.मात्र कालपासून आलेल्या या पावसाने मुंबईत पाऊस जोर धरतो आहे, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईमध्ये वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.तसेच आज दिवसभरात आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही तुरळक भाग सोडले तर शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचलेले दिसून आले नाही.
तर विरार-चर्चगेट पश्चिम रेल्वे सेवा तसेच शहरातल्या वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहेत. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांनी भात पेरणीस सुरवात केली आहे. विरार पूर्व मनवेल पाडा परिसरातील आज सकाळी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळाले आहे.