सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना तसेच सर्व घटकांना खूश करण्याचा विचार करण्यात आला आहे.
दरम्यान स्त्री हा कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिला देखील आपल्याला समाजात पाहायला मिळतात. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. २१ ते ६० वर्षे वयाच्या पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार दिले जाणार आहेत. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून केली जाणार आहे.