शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून बी-बियाण्यांसाठी अनुदान, सिंचन सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, शेतमाल साठवणूक इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहेत.अशी माहिती अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच २०२३-२४ आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांच्या साहय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, एक रुपयात पीकविमा अशा योजना सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजनेतून तीन वर्षात २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच आदी शेतकरी उपकरणं खरेदी करण्यासाठी १ हजार २३९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना पिकाची साठवणूक करण्यासाठी गाव तिथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे.
खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काल तर १०२१ महसूल मंडळात दुष्कालसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळाचे पंचनामे जलद व्हावेत यासाठी नागपुरातीला ई-पंचनामा घेण्याची चाचणी यशस्वी झाल्याने ही पद्धत राज्यभर लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
तसेच कापूस, सोयाबीन तसेच तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी यासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन २०२४-२५ मध्ये ३४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले आहे.
नवीन दुग्धव्यवसाय योजना सुरु केली जाईल. नवा उद्योजक निर्माण करताना शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम करणार असून प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले होते. . एक लीटर ५ रुपये प्रमाणे १ जुलैपासून अनुदान योजना सुरु केले जाईल अशी घोषणादेखील अजित पवार यांनी यावेळी केली आहे.