प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण या तगड्या स्टारकास्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ अखेर आज 27 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी केलेल्या आगाऊ बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. साऊथचा सुपरस्टार प्रभासचा कल्की 2898 AD या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकले आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 100 कोटींवर पोहोचली आहे.
नेहमीच्या कामकाजाच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी थिएटरमध्ये पोहोचलेल्या गर्दीला जणू राष्ट्रीय सुट्टी असल्यासारखे वाटले. या चित्रपटामुळे प्रभासचे स्टारडम पुन्हा वाढले आहे. याआधी त्याच्या बाहुबली या चित्रपटाने थिएटरमध्ये प्रचंड कमाई केली होती आणि तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासची फॅन फॉलोइंग खूप वाढली होती.
पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोडून या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. याआधी 2022 मध्ये रिलीज झालेल्या RRR ने पहिल्या दिवशी 133 कोटी रुपयांची कमाई केली होती, याशिवाय 2017 मध्ये बाहुबली 2 ने 121 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर 2022 मध्ये रिलीज झालेल्या KGF ने 116 कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘कल्की 2898 एडी’ बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच दुसरीकडे त्याच्या OTT रिलीजबाबत माहिती समोर आली आहे. ‘कल्की 2898 एडी’ ची हिंदी आवृत्ती OTT वर रिलीज होणार आहे. ‘कल्की 2898 एडी’चे हिंदी ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने UA प्रमाणपत्र दिले आहे. तसेच, चित्रपटाच्या सुरुवातीला व्हॉईस ओव्हरमध्ये चित्रपटाचा आशय काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमर देण्यात आले आहे. चित्रपटाचा कालावधी 3 तासांचा आहे.