सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली आहे. शेतकरी, दुरबा घटक, महिला , युवक अर्थात समाजातील सर्वच घटकांसाठी काही ना काही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असून ज्या प्रमाणे बहिणींसाठी योजना आणली त्या प्रमाणे मुलांसाठी देखील आणा अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी हा अर्थसंकल्प थापांचा आणि गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका केली. तसेच मुलींसाठी काही आणत असला तर मुलांसाठी पण आणा अशी टीका केली आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”आमचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प समावेशक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे आजच्या अर्थसंकल्पाचे वैशिट्य आहे.तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ”जर्मनीत ४ लाख नोकर्त्यांचा एमओयू साइन केला आहे. आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना १० हजार रुपये आम्ही देणार आहोत. त्यांचे स्किल्स डेव्हलप झाले कि त्यांना रोजगार मिळेल. आम्ही लाडका भाऊ योजना केली ना? पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बीटा योजना राबविली त्याचे काय? म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला.”