नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विविध परीक्षांसाठी नवीन परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत, CSIR-NET, UGC-NET आणि NCET परीक्षा घेतल्या जातील. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (UGC-NET) संगणकावर आधारित परीक्षा होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा पेन आणि पेपरवर आधारित होती.
NTA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, UGC NET परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान, तर CSIR-NET परीक्षा 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान होणार आहे. तर एनसीईटीची परीक्षा २१ जुलै रोजी होणार आहे. विशेष म्हणजे पेपरफुटीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट परीक्षा रद्द केली होती. यानंतर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नीट परीक्षा (NEET) च्या पेपर लीकच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज लोकसभेमध्ये चांगलाच मुद्दा लावून धरल्याचे दिसून आले आणि त्यांचे नेतृत्व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केले, ते म्हणाले,“काल, विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि आज आम्हाला NEET विषयावर चर्चा करायची आहे यावर एकमत झाले. इथे सभागृहात NEET वर चर्चा व्हायला हवी. मी पंतप्रधानांना विनंती करतो की ही तरुणांच्या प्रश्नावरची योग्य चर्चा झाली पाहिजे आणि ती आम्ही आदरपूर्वक करू, तुम्हीही या चर्चेत सहभागी व्हावे “
मात्र विरोधी बाकांवरील गदारोळ वाढल्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.राहुल गांधी यांनी NEET चा मुद्दा उपस्थित केला आणि विरोधी खासदारांसह या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा आधी घेण्यात यावी, असा आग्रह धरला
NEET-UG आणि UGC-NET परीक्षांसाठी, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने 23 जून रोजी NTA द्वारे परीक्षा आयोजित करताना कथित अनियमिततेबद्दल फौजदारी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. .तसेच शिक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांनी परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा आणि NTA च्या कार्यपद्धतीवर शिफारशी करण्यासाठी तज्ञांची एक उच्च-स्तरीय समिती स्थापन केली आहे.