राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, रत्नागिरी, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. तसंच पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.