काल आयसीसी टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत भारताने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव केला आणि आपण जगातील अळ्वल संघ असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. विराट कोहली, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र अंतिम सामन्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा ही मॅच आपल्या हातातून निसटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग जमा होऊ लागले. पण अखेर भारताने द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला आणि प्रशिक्षक रहिल द्रविडसह कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडने टीम इंडिया जिंकल्यानंतर आपला आनंद उत्कटपणाने साजरा केला. वर्ल्डकपची ट्रॉफी विराट कोहलीने राहुल द्रविडच्या हातात दिल्यानंतर ‘मिस्टर कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रविडने अक्षरश:गर्जना करत सेलीब्रेशन केले. तेव्हाचा त्याचा आवेश पाहून इतर खेळाडूही अवाक् झाले. द्रविडच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलेला दिसून आला.
यानंतर प्रतिक्रिया देताना राहुल द्रविड म्हणाला की,
“खेळाडू म्हणून ट्रॉफी जिंकण्याइतपत मी भाग्यवान नव्हतो, पण जेव्हाही मी खेळलो तेव्हा मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले. संघाचे प्रशिक्षक म्हणून संधी मिळाल्याने मी भाग्यवान होतो, मी नशीबवान होतो की या मुलांनी हे शक्य केले. ही ट्रॉफी जिंकण्यास सक्षम आहे,आणि टीम इंडियाच्या जेतेपदापर्यतच्या या प्रवासाचा मी आनंद घेऊ शकलो, मला या संघाचा किती अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत ” असे द्रविड म्हणाला आहे.
राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय संघाने आशिया चषक जिंकला, मात्र त्यांना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.या कालावधीत भारतीय संघाने दोनदा अंतिम फेरी गाठली होती, पण विजेतेपदापासून दूर राहिले. पण मात्र आता टीम इंडियाने जेतेपद पटकावत राहुल द्रविडला एक उत्तम अलविदा केला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील अंतिम सामना राहुल द्रविड यांच्यासाठी भारताचे प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता.