आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या (Legislative Council Election) चार जागांसाठी निवडणूकीचा निकाल लागणार आहे. यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली आहे . या जागांसाठी आज मतमोजणीला सुरवात झाली आहे.
मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, मतमोजणीला ८ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी करणार मतमोजणी करणार आहेत . कोटा पद्धतीमुळे निकाल यायला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी निवडणूक घेण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक घेण्यात आल्यामुळे तिला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगलेली दिसून आली. .
मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात सामना आहे. दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात लढत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ ४ उमेदवार उभे आहेत, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे.तर मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये ही लढत असणार आहे.