संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे काल पुण्यनगरीत आगमन झाले. अखंड विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी पायी चालत पालखीसोबत पुण्यात दाखल झाले. काल आणि आज असे दोन दिवस दोन्ही पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. पुणेकरांना या दोन्ही संतांच्या सहवासाचे भाग्य लाभणार आहे. काल या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते आज वाहतुकीस बंद ठेवण्यात आले होते.
काल सायंकाळी दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्या उद्या म्हणजे मंगळवारी २ जुलै रोजी पहाटे पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात आहे. तर संत तुकाराम महाराजांचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात आहे. या दोन्ही मंदिरांच्या परिसरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, सजावट, रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य शिबिरे, मोबाईल टॉयलेट आदी सोयी सुविधांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवषी या वारीच्या निमित्ताने हजारो वारकरी पुण्यात येत असतात. त्याच अनुषंगाने यावर्षी देखील पुण्यात ठिकठिकाणी वारकऱ्याच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उद्या २ जुलै रोजी तुकोबा रायांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने रवाना होईल तर ज्ञानोबांची पालखी सासवड दिशेने जाणार आहे.