सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक धबधबे, पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान शनिवार रविवार जोडून सुट्टी आल्याने लोणावळा येथे देखील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान लोणावळा येथील प्रसिद्ध भुशी डॅम येथून फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागे असलेल्या धबधब्यातून एक अक्खे कुटुंब वाहून गेले आहे. या कुटुंबातील ५ जण वाहून गेले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वर्षा सहलीसाठी गेलेल्या अन्सारी कुटुंबातील ५ जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या मागे असलेल्या धबधब्यामध्ये ही घटना घडली आहे. या कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडला असून, एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान या पाण्यातून १० जण वाहून गेले होते. त्यापैकी ५ जणांना पाण्याचा प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आले. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेनंतर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळ भेट देऊन शोधकाऱ्याचा आढावा घेतला आहे.
शिवदुर्ग टीममधील अनेक जण हे अवघड असे शोधकार्य सुरू ठेवले आहे. त्यातील एका सहकार्याने सांगितले की, मोठा पाऊस झाला कि पर्यटक लोणावळाला येत असतात. त्याप्रमाणेच हे कुटुंब याठिकाणी भुशी धरणाच्या येथे आले होते. मात्र ते पाण्यात गेले असताना पाऊस अचानक वाढला. या ठिकाणी १५ ते २० मिनिटे जरी पाऊस झाला तरी अचानक धबधब्याचे पाणी वाढते. त्यामुळे या कुटुंबाला पाण्याचा अंदाज आला नाही. पाचपैकी ४ मृतदेह भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत. एकाच शोध सुरू आहेत.