बंगालमधल्या कूचबिहार आणि चोपडा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या महिला आमदारांनी विधानसभेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या निषेध कार्यक्रमाचे नेतृत्व भाजप आमदार आणि महिला मोर्चाच्या नेत्या अग्निमित्रा पॉल करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यात आतंकवाद सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत आहे.
तृणमूलवर कूचबिहारच्या माथाभंगा-2 ब्लॉकमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक नेत्याला विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.तसेच चोपडा इथला तृणमूल नेता तजमुल उर्फ ‘जेसीबी’चा व्हिडिओ रविवारी दुपारी समोर आला आहे. . त्या व्हिडिओमध्ये जेसीबी एका मुलीला रस्त्यावर फेकताना आणि काठीने मारहाण करताना दिसत आहे. मारहाण झालेल्या मुलीला केसांनी ओढून जमिनीवर ढकलले आणि पुन्हा मारहाण करण्यास सुरवात झाली असे ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कूचबिहार घटनेबाबत भाजप सोमवारी विधानसभेत आंदोलन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आधीच सांगितले होते. यानंतर पक्षाच्या महिला आमदारांनी विधानसभेत आंदोलन करण्याची परवानगी मागितली. मात्र, परवानगी न मिळाल्याने अग्निमित्रा पॉल ह्या सकाळी विधानसभेच्या कार पोर्चसमोर आंदोलनास बसल्या आहेत. त्याच्यासोबत शिखा चॅटर्जी, चंदना बौरी, सुनीता सिंग याही आहेत. प्रत्येकाच्या गळ्यात फलक लटकवलेले आहेत. राज्यात महिलांवर एकामागून एक हल्ले होत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आणि हे सर्व घडत असताना महिला मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी गप्प का?असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विचारला आहे.
अग्निमित्रा म्हणाल्या, “भाजपचे शिष्टमंडळ कूचबिहारला गेल्यानंतर पोलिसांनी पीडितेचे जबाब घेतले. त्या घटनेनंतर लगेचच तृणमूलच्या एका नेत्याने चोपडा येथे एका महिलेशी उघडपणे गैरवर्तन केल्याचे दिसून आले. आम्ही राज्यातील महिलांवरील ह्या सतत घडत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत आहोत”.
तसेच जर तृणमूलचे नेते धरणे धरू शकतात तर आमच्या धरणे आंदोलनात अडचण का आहे, असा सवाल केला आहे. तसेच त्या म्हणाल्या आहेत की, आम्ही भाजपच्या महिला आमदार कूचबिहार पीडितांना घेऊन राजभवनात जाणार आहेत. गरज पडल्यास आम्ही राष्ट्रपतींकडेही जाऊ असेही अग्निमित्रा म्हणाल्या आहेत.