सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आजच्या दिवशी विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस व विरोधी पक्षनेते यांनी माफी मागण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे” असे ते म्हणाले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडताना राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधताना देशाच्या विचारांवर पद्धशीर हल्ला झाला असल्याची टीका केली.
“भारताच्या कल्पनेवर, संविधानावर आणि संविधानावरील हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या लोकांवर पद्धतशीरपणे आणि पूर्ण प्रमाणात हल्ला झाला आहे. आपल्यापैकी अनेकांवर वैयक्तिक हल्ले झाले आहेत. काही नेते अजूनही तुरुंगात आहेत.भारत सरकारच्या आदेशाने, भारताच्या पंतप्रधानांच्या आदेशाने माझ्यावर हल्ला झाला. म्हणजेच ईडीने तब्बल ५५ तास माझी चौकशी सुरु केली. अभयमुद्रा हे काँग्रेसचे प्रतीक आहे. अभयमुद्रा ही निर्भयतेची ओळख आहे. आमच्या सर्व महापुरुषांनी अहिंसेबद्दल आणि भय संपविण्याबद्दल भाष्य केले. परंतु, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्याबद्दल बोलतात. तुम्ही हिंदू नाहीच आहात”, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत हिंसाचाराला कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. “विरोधी पक्षनेते स्पष्टपणे म्हणाले की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसेचे बोलतात आणि हिंसा करतात. करोडो लोक अभिमानाने स्वत:ला हिंदू म्हणवतात हे त्यांना माहीत नाही. हिंसेला कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. त्यांनी माफी मागावी,” असे अमित शहा म्हणाले.