इस्रायलवर गाझातील पॅलेस्टिनी सशस्त्र संघटना इस्लामिक जिहादने रॉकेटने हल्ला केला आहे . मात्र या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही. त्याच वेळी, इस्रायली सैन्याने गाझा शहराच्या उपनगरातील शेजाया आणि रफाह येथे रणगाड्यांसह मोठे प्रत्युत्तराचे हल्ले सुरू केले आहेत.
इराण समर्थित इस्लामिक जिहादने म्हटले आहे की पॅलेस्टिनींवर इस्रायलच्या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून सैनिकांनी रॉकेट हल्ले केले. तर इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, गाझामधून इस्रायलवर सुमारे 20 रॉकेट डागण्यात आले असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या हल्ल्यामुळे हे दिसून आले आहे की, इस्रायलवर हल्ला करण्याची क्षमता अजूनही त्यांच्याकडे आहे.
पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची ही क्षमता संपवण्यासाठी आम्ही लढत आहोत, असे लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायली रणगाडे गाझा शहरातील शेजाया या उपनगरात खोलवर घुसले आहेत आणि तेथे गोळीबार करत आहेत. इस्त्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी सैनिकांमध्ये पाच दिवसांपासून चकमक सुरू आहे.
शेजायामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले असून बरीच शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.तर इजिप्तच्या सीमेवर असलेल्या रफाहमध्ये इस्रायली सैन्य रणगाड्यांसह गोळीबार करत आहे. तेथील एका घरात इस्रायली सैनिक अडकले होते आणि ते घर स्फोटाने जमीनदोस्त झाल्याचा दावा हमासने केला आहे. या घटनेत अनेक इस्रायली सैनिक मारले गेले आहेत
जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत इस्रायली सैन्याला हे शहर ताब्यात घेता आलेले नाही. पण 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 38 हजारांच्या जवळ पोहोचली आहे.