पुण्यामध्ये झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी (1 जुलै) रोजी पुण्यात झिका व्हायरसच्या आणखी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 6 झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये एरंडवणे येथे राहणाऱ्या दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे.
पुण्यात झिकाची पहिले रुग्ण ज्या परिसरात आढळले होते तिथेच दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या परिसरात तपासणी सुरु केली असून या भागातून सॅम्पल्स गोळा केले जात आहेत.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी 12 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत ‘झिका’च्या संसर्गाचे निदान होणाऱ्या रुग्णांमधील गर्भवतींची संख्या दोन झाली आहे. या दोन्ही गर्भवती एरंडवणे परिसरातील रहिवासी आहेत. रोगनिदान झालेल्या रुग्णांनी देशात किंवा परदेशात प्रवासाचा इतिहास नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. पुण्यातील झिका व्हायरसचा प्रसार हा चिंतेचा विषय बनला असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पुढील संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.