उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक वर्षातील ही अतिशय भयानक दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले जात आहे.
या सत्संगाचे आयोजन ‘भोले बाबा’ उर्फ बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी यांच्या संस्थेने केले होते. मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेनंतर सत्संग जिथे झाला आणि चेंगराचेंगरी झाली तिथे मृतदेहांचा अक्षरश: खच पडला होता. घटनास्थळावरचे दृश्य पाहून डोळ्यातील अश्रूही थिजतील अशी भयानक परिस्थिती होती.
सत्संग आटोपल्यानंतर भोले बाबा गाडीत बसून निघाले असता, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी अनुयायांचा जमाव त्यांच्या मागे धावला. बाबांचा पाय जिथे पडेल तेथील माती उचलत अनुयायी पुढे पुढे जात राहिले.रस्त्याच्या पलीकडे पाच ते सहा फूटावरच मोठा खड्डा होता. मागून लोकांचा जमाव अंगावर आल्याने समोरचे लोक दबावामुळे खड्ड्याच्या दिशेने पडू लागले.आणखी लोक येतच राहिले आणि एकमेकांच्या अंगावर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली.
एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्याची माहिती असतानाही आयोजकांनी घटनास्थळी रुग्णवाहिका व अन्य व्यवस्था नव्हती त्यामुळे या दुर्घटनेनंतर बचावकार्यास वेळ लागला आणि मृतांचा आकडा वाढला.
अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होते.अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अद्याप पटलेली नव्हती.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले गेले असून तपासासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. .पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.