सध्या राज्याच्या विविध भागात अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरण परिसरात देखील पाऊस होत आहे. नागरिकांसाठी व राज्यासाठी ही आनंदाची बाब आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोयना धरण परिसरात १३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर परिसरात देखील पाऊस होत आहे. कोयना धरणात २ टीमशी पाण्याची वाढ झाली आहे. आता धरणात एकूण २३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना धरणाची क्षमता ही १०३ ते १०५ टीएमसी इतकी आहे. सातारा जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देखील तब्बल २१ दिवसांनी पावसाने हजेरी लावली आहे.
गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. २१ दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे पुणेकर सुखावले. उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला. खडकवासला धरणसाखळी परिसरात देखील समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. दरम्यान पाच जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.