पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यसभेत बोलत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशाच्या जनतेने आमच्या विश्वास दर्शविला आहे. ६० वर्षानंतर असे झाले आहे की एकच सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे. ६० वर्षानंतर घडलेली ही एक असामान्य घटना आहे. अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”एनडीएच्या विजयानंतर काही जण मुद्दाम तोंड फिरवून बसले होते. आमच्या सरकारला १० वर्षे पूर्ण झाली. अजून २० वर्षे बाकी आहेत. एक तृतीयांश कार्यकाळ पूर्ण झाला असून, दोन तृतीयांश कार्यकाळ बाकी आहे.” काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलत असताना देखील राहुल गांधी यांच्यसह विरोधकांवर जोरदार टीका केली होती.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ”देशातील जनतेचे गोंधळाचे राजकारण नाकारून विश्वासाचे राजकारण स्वीकारले आहे. माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे साधे सरपंचही झाले नव्हते. तर आज महत्वाच्या पदांवर पोहोचले आहेत. याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. संविधान आपल्यासाठी केवळ लेखांचा संग्रह नसून, तो आपला आत्मा आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करू असे आमच्या सरकारने सांगताच, संविधानाच्या प्रती घेऊन उड्या मारणाऱ्या लोकांनी त्याचा निषेध केला याचे मला आश्चर्य वाटते.”
”देशाच्या जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्यानेच आम्हाला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.” मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला. मात्र मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले होते. राज्यसभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”काँग्रेसला ऑटो मोडचे सरकार हवे आहे. त्यांनी ऑटो पायलट मोडवर सरकार चालवले आहे. काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय आहे.”