आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. देशाच्या जनतेने आमच्या विश्वास दर्शविला आहे. ६० वर्षानंतर असे झाले आहे की एकच सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे. ६० वर्षानंतर घडलेली ही एक असामान्य घटना आहे. दरम्यान मोदींचे भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला. यावर शरद पवारांनी देखील भाष्य केले आहे.
“मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर आहेत. पंतप्रधान असोत किंवा सभागृहाचे अध्यक्ष, त्यांचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण आज त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि त्यामुळे संपूर्ण विरोधक त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्ही सभात्याग केला”, असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला कारण पंतप्रधान वरच्या सभागृहात ‘आभाराच्या प्रस्तावाला’ उत्तर देताना काही “चुकीच्या गोष्टी” बोलत होते, असे सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
सभात्यागानंतर लगेचच पत्रकारांना संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. “खोटे बोलणे, लोकांची दिशाभूल करणे आणि सत्याच्या पलीकडे गोष्टी बोलणे ही त्यांची सवय आहे. मी त्यांना नुकतेच विचारले आहे की, जेव्हा ते संविधानाबद्दल बोलत होते, तेव्हा तुम्ही संविधान बनवले नाही, तुम्ही लोक विरोधात होता,” असे खर्गे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मला फक्त हे स्पष्ट करायचे होते की संविधानाच्या बाजूने कोण आहे आणि कोण विरोधात आहे. RSS ने 1950 मध्ये त्यांच्या संपादकीयमध्ये लिहिले होते की, संविधानाबद्दल वाईट गोष्ट म्हणजे भारताच्या इतिहासाबद्दल काहीही नाही. त्यांनी संविधानाला विरोध केला. ते सुरुवातीपासूनच विरोधात आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांच्या उत्तरादरम्यान खरगे यांच्यासोबत बाहेर पडलेल्यांमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी-एससीपी अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश होता.