झारखंड मुक्ती मोर्चाचे ((Jharkhand Mukti Morcha) नेते हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर मुक्तता होताच राज्यात खांदेपालटाची प्रक्रिया सुरू झाली. मुख्यमंत्री चंपाई सोरेन(Champai Soren) यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी समर्थकांसह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यपालांना समर्थनाचे पत्रही सोपवले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांनी बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता राजभवनात जाऊन आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर आणि मंत्री मिथिलेश ठाकूरही उपस्थित होते. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना राजीनामा सोपवल्यानंतर हेमंत सोरेन यांनी नवीन सरकार स्थापनेसाठी दावा केला. यादरम्यान हेमंत सोरेन यांनी झामुमो, आरजेडी आणि काँग्रेस आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्रही राज्यपालांना सोपवले.
राजभवनात जाऊन राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सांगितले की, त्यांनी राज्यपालांना राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे. तसेच त्यांनी असे सांगितले की, हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नवीन नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी हेमंत सोरेन म्हणाले की, नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तर जेएमएमचे नेते स्टीफन मरांडी यांनी सांगितले की, विचाराअंती राजभवनाने गुरुवार, 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत माहिती देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे आमदार बन्ना गुप्ता म्हणाले की, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करण्यापूर्वी हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर झामुमोच्या चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झारखंड हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केल्याने त्यांची तब्बल पाच महिन्यांनंतर २८ जून रोजी तुरुंगातून सुटका झाली आहे.