सध्या देशभरात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे वाहत आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मुंबईत विविध विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत हजारो कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच 13 जुलै रोजी मुंबईत प्रस्तावित गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली-ठाणे लिंक रोड सबवेची पायाभरणी ते करणार आहेत. मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 6,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 1,170 कोटी रुपयांच्या प्रस्तावित ऑरेंज गेट ते ग्रँट रोड एलिव्हेटेड रोड प्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी मुंबई महापालिकेच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प, मलनिस्सारण योजनांचा समावेश आहे.