टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून टीम इंडिया (Indian Cricket Team) आज अखेर मायदेशी परतली आहे. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. . विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या AIC24WC या विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले आहे. आज सकाळी 6 वाजता टीम इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले .यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आजचा दिवस पूर्ण देशासाठी आणि टीम इंडियासाठी विशेष असणार आहे.
आज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर असणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटच्या एनसीपीएपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसने प्रवास करेल. खेळाडू थकले असल्याने एनसीपीए, नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून छोटी विजयी परेड करण्याचा निर्णय बीसीसीय कडून घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर चाहत्यांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमात टीम इंडियाला 125 कोटी रुपये दिले जाणार आहेत. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमसाठी या बक्षिसाची घोषणा बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती.
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 रननी पराभव केला. याचसोबत भारताने 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. .