आज टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बार्बाडोस येथून दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी चाहत्यांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. यानंतर आज बार्बाडोसहून परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर टीम लोककल्याण मार्गावर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचली. तिथे भारतीय संघाने तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो देखील काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेलत्यानंतर भारतीय संघ आज मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडिया नरिमन पॉईंटच्या एनसीपीएपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसने प्रवास करेल. खेळाडू थकले असल्याने एनसीपीए, नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून छोटी विजयी परेड करण्याचा निर्णय बीसीसीय कडून घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे. सध्या मुंबईत महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेणार आहेत.
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर चाहत्यांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमात टीम इंडियाला 125 कोटी रुपये दिले जाणार आहेत. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमसाठी या बक्षिसाची घोषणा बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती.