आज ब्रिटनमध्ये संसदीय निवडणूक होत आहे. विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे केयर स्टारमर हे पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवार मानले जात आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता मतदान सुरू होईल आणि रात्री अडीच वाजेपर्यंत चालेल. ब्रिटनचे ५ कोटी मतदार नव्या सरकारला मतदान करतील. कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे केयर स्टारमर हे पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवत आहेत. यावेळी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लेबर पार्टीला बहुमत मिळण्यापासून रोख असे सुनक म्हणाले आहेत.
ऋषी सुनक यांनी आपली पत्नी अक्षता मूर्तींसोबतचा एक मतदान केंद्राबाहेरचा फोटोही शेअर केला आहे. सुनक यांनी एक्स वर पोस्ट शेअर केली आहे. ”कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान करा आणि लेबर पार्टीला बहुमत मिळण्यापासून रोख. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला चांगले कार्य करते येईल.” युनायटेड किंगडममधील मतदान केंद्रे आज सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) देशातील ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी उघडली गेली.
विशेष म्हणजे ब्रिटनमधील नागरिकांव्यतिरिक्त तेथे राहणारे राष्ट्रकुल देशांचे नागरिकही मतदान करू शकतात. म्हणजे ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय, पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियन लोकही निवडणुकीत मतदान करू शकतात. ब्रिटनच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात. मतदार आपले मत पोस्टाने किंवा पत्राद्वारे मतदान केंद्रावर पाठवू शकतो. मतदार इतर कोणत्याही माध्यमातून मतदान करू शकतात. ब्रिटनमध्ये 15 तास मतदान प्रक्रिया सुरू असते. तेथील राजा किंवा राजघराण्याला मतदानाचा अधिकार नाही. प्रचारासाठी रॅली नाही, तर घरोघरी जाऊन प्रचार करावा लागतो. अशा काही ब्रिटनच्या निवडणुकीतील खास गोष्टी आहेत.
भारताप्रमाणेच ब्रिटनमध्येही संसदेची दोन सभागृहे आहेत. खालच्या सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स आणि वरच्या सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतात. ब्रिटनचे नागरिक सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्ससाठी खासदार निवडतात. कोणत्याही पक्षाला 50% पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरी तो सरकार स्थापन करण्याचा दावा करतो. पक्षाचा नेता देशाचा पंतप्रधान म्हणून घोषित केला जातो. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 650 जागा आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी 326 चा जादुई आकडा पार करावा लागणार आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर ते इतर लहान पक्षांसोबत आघाडीचे सरकार बनवू शकतात. हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य निवडले जात नसले तरी त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार केली जाते. त्याची सदस्य संख्याही निश्चित नाही. 20 जून 2024 पर्यंत, ब्रिटनच्या उच्च सभागृहात 784 सदस्य होते.