हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. बुधवारी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या घटनेत 121 भाविकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार देखील सतर्क झाले आहे. महाराष्ट्रात आता पंढरीची वारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. हाथरस दुर्घटनेनंतर पंढरपूर प्रशासनाने पंढरपूरमध्ये अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. वारीच्या निमित्त तेथील परिसर विस्तीर्ण करण्यासाठी अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या कारवाईवर व्यापारी आक्रमक झाले आहेत. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. हाथरस येथील दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पंढरपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी प्रांताधिकारी, डीवायएसपी, नगरपालिका मुख्याधिकारी, १०० पेक्षा जास्त कर्मचारी, जेसीबी व टेम्पोसह रस्त्यावर उतरले होते.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक वर्षातील ही अतिशय भयानक दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या सत्संगाचे आयोजन ‘भोले बाबा’ उर्फ बाबा नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी यांच्या संस्थेने केले होते. मृत आणि जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेनंतर सत्संग जिथे झाला आणि चेंगराचेंगरी झाली तिथे मृतदेहांचा अक्षरश: खच पडला होता. घटनास्थळावरचे दृश्य पाहून डोळ्यातील अश्रूही थिजतील अशी भयानक परिस्थिती होती.
सत्संग आटोपल्यानंतर भोले बाबा गाडीत बसून निघाले असता, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी अनुयायांचा जमाव त्यांच्या मागे धावला. बाबांचा पाय जिथे पडेल तेथील माती उचलत अनुयायी पुढे पुढे जात राहिले.रस्त्याच्या पलीकडे पाच ते सहा फूटावरच मोठा खड्डा होता. मागून लोकांचा जमाव अंगावर आल्याने समोरचे लोक दबावामुळे खड्ड्याच्या दिशेने पडू लागले.आणखी लोक येतच राहिले आणि एकमेकांच्या अंगावर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली.