यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची निवंडूक अत्यंत चुरशीची ठरली. पुण्यात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. वसंत मोरे अपक्ष, रवींद्र धंगेकर महाविकास आघाडी आणि मुरलीधर मोहोळ महायुतीकडून उभे राहिले होते. मात्र या निवडणुकीत महायुतीचे व भाजपचे उमेदवार मोहोळ विजयी झाले. मात्र वसंत मोरे हे पराभूत झाले आणि त देखील जप्त झाले. दरम्यान आज वसंत मोरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. वसंत मोरे लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री येथे भेट घेतली. लवकरच वसंत मोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या ९ जुलै रोजी मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे अपक्ष लढले होते. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे म्हणाले, ”आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ९ जुलै रोजी माझा पक्षप्रवेश पार पडणार आहे. सर्व प्राथमिक चर्चा या भेटीत झाल्या आहेत. विधानसभेचे माहिती नाही. त्याबद्दल पक्षप्रमुख ठरवतील. सध्या पक्षप्रवेश महत्वाचा आहे.” वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. ते कदाचित खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहु शकतात.