गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस कोसळत आहे. राज्यातील बऱ्यापैकी भाग हा मान्सूनने व्यापला आहे. काही ठिकाणी अजूनही पावसाची हजेरी पाहायला मिळाली नाही. मात्र कोकण, सातारा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने चांगली बॅटिंग केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे. काही ठिकाणी नुसते ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सातारा, कोल्हापूर आणि अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. जालना, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारलेली आहे. पूर्व विदर्भ , मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी हवा तास पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. भंडारा सशर्त देखील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने बळीराजा देखील सुखावला आहे. जिल्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुणे शहरात देखील पावसाची मध्ये मध्ये हजेरी पाहायला मिळत आहे.