निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १२ जुलैला विधानपरिषदेत निवडणूक पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेची महायुतीने एकूण ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एकूण ११ जागांवर १२ उमेदवार कायम राहिले आहेत. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र कोणीही अर्ज मागे न घेतल्याने यंदाची निवडणूक पण चुरशीची व रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे देखील ३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
१२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहे या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहिल्यास भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात.