मुंबईतील जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना आता मुंबई पोलिसांनी दिलासा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली असून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. . या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केला गेल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.तसेच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.
रविंद्र वायकर यांच्यावर आरोप काय?
मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा रवींद्र वायकर यांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणामध्ये रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रविंद्र वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता.हा प्रवेश केल्यामुळेच त्यांना क्लीन चिट मिळाल्याचा आरोप उबाठा गटाचे संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता केला आहे.