युरो 2024 (Euro Cup 2024) या फुटबॉल स्पर्धेमध्ये यजमान जर्मनीला रोमहर्षक सामन्यात स्पेनकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला आहे.हा पराभव जर्मनीसाठी खूपच निराशाजनक होता, कारण त्यांचा एक स्टार खेळाडू टोनी क्रुस (Toni Kroos) या पराभवानंतर निवृत्त झाला आहे. युरोपियन चॅम्पियनशिप संपल्यानंतर तो खेळणे सुरू ठेवणार नसल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते. पण आता पराभवानंतर क्रुसने युरो जिंकण्याचे आपले स्वप्न ‘भंग’ झाल्याचे उघड केले आहे.
“प्रामाणिकपणे, आत्ता मुख्य भावना अशी आहे की स्पर्धा संपली आहे, कारण आम्हा सर्वांना एक मोठे ध्येय होते जे आम्हाला मिळून साध्य करायचे होते आणि ते स्वप्न आता भंग पावल्याचे दिसून आले आहे. असे क्रुस याने पोस्ट गेम कॉन्फरन्समध्ये पत्रकारांना सांगितले आहे.
34 वर्षीय टोनी क्रुस हा गेल्या दशकात फुटबॉल हा खेळ खेळणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडे अनेक ट्रॉफी आहेत ज्यांचे अनेक जण फक्त स्वप्न पाहू शकतात. तथापि, युरोपियन चॅम्पियनशिप ही त्याची शेवटची कामगिरी ठरली असती, कारण कारकिर्दीत त्याने न जिंकलेली ही एकमेव स्पर्धा आहे.
जर्मन चाहत्यांना त्यांच्या संघाच्या कामगिरीचा अभिमान वाटेल कारण ज्युलियन नागेलसमॅनच्या नेतृत्वाखालील जर्मन संघाने अल्पावधीत लक्षणीय सुधारणा केली आहे. आठ वर्षांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचला आहे. .
जर्मन मिडफिल्डर क्रूस म्हणाला की , “आम्ही सर्वजण अभिमान बाळगू शकतो कारण आम्ही सुधारलो आहोत. मला आनंद आहे की मी एक फुटबॉल राष्ट्र म्हणून जर्मनीला पुन्हा आशा देण्यास मदत केली आहे. भविष्यात मला खात्री आहे की संघ यशस्वी होईल, पण आज आम्ही दुःखी आहोत कारण आम्हाला या स्पर्धेत आणखी थोडा वेळ टिकून राहायचे होते.”