आज हिंगोली शहरात मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली पार पडणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला दिलेला कालावधी 13 जुलै रोजी संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत निघणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे आता हिंगोलीमध्ये दाखल झाले असून जोरदार स्वागत त्यांचे केले जात आहे.जरांगे यांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फूट लांब असलेला आणि दीडशे किलो वजनाच्या गुलाब फुलांच्या तयार करण्यात आला आहे.दरम्यान जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांकडून 51 उखळी तोफांची सलामी देण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समुदाय या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. सरकारने आरक्षण दिले नाही तर आम्हाला आरक्षण देणारे सरकार बनवावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड असा हा जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांशी संवाद साधतील असे सांगितले जात आहे.