दिल्ली अबकारी घोटाळ्यातील आरोपी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने पुन्हा एकदा 15 जुलैपर्यंत वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना जामीन मंजूर केला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण न मिळाल्याने ईडीने संध्याकाळी उशिरा चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती.
सिसोदिया यांना सर्वात आधी सीबीआयने दारू घोटाळ्यात अटक केली होती. त्यानंतर पुढच्याच महिन्यात ९ मार्चला ईडीने सिसोदिया यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. तेव्हापासून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तिहार तुरुंगात आहेत. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. राऊस एव्हेन्यू कोर्टाने यापूर्वी मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत अनेकवेळा वाढ केली आहे . यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळला होता.