लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र महायुतीने सावध पवित्रा घेतला आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सर्वाना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे सल्ले दिले आहेत.
आमदारांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”महायुतीतील नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलू नये. महायुतीमध्ये राहिलो तर सर्वांना तडजोड करावी लागेल. सर्वानी एकमेकांचा आदर राखावा.” देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट निर्देश दिल्याचे म्हटले जात आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”आपण महायुतीमध्ये आहोत. तुम्हाला कधी काही अडचण वाटल्यास माझ्याशी, एकनाथ शिंदे किंवा अजित दादांशी येऊन बोला. महायुतीत असल्याने तडजोड करावीच लागेल. विरोधात त्यांच्यात तडजोड करायला तयार आहेत. आपल्यालाही यासाठी तयार राहावे लागणार आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याला मुद्दा बनवू नका. ”
आगामी विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनानंतर या सर्व गोष्टींची दखल पक्षश्रेष्ठीनी घेतली असून, अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेतील चुका टाळण्यासाठी भाजप सावधगिरी बाळगताना दिसत आहे.
दरम्यान, कालच्या मेळाव्यात विधानपरिषद निवडणुकीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १२ जुलैला विधानपरिषदेत निवडणूक पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.