सध्या राज्यातील नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग , रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस होत असल्याने त्याचा फटका आता कोकण रेल्वेला बसला आहे. कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या एकतर उशिरा जात आहे तर काही गाड्या रखडल्या आहेत. तर कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या देखील रखडल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील काही ठिकाणी माती खचल्याने तसेच रुळावर झाडे पडल्याने अनेक गाड्या रखडल्या आहेत. सीएसटीकडे येणाऱ्या अनेक गाड्या अडकल्या आहेत. तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भगत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पनवेलमध्ये अनेक सखल व रहिवासी भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
कोकणात तर पावसामुळे मुसळधार हजेरी लावली आहे. कोकणतीळ सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड मधील जगबुडी नदीने देखील धोक्याची पाणी पातळी ओलांडली असल्याचे समजते. तर काही दिवसांपूर्वी परशुराम घाटात देखील माती खचल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे प्रवाशानी रेल्वेने किंवा महामार्गावरून प्रवास करत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मुंबईत देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारलेली आहे. पूर्व विदर्भ , मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी हवा तास पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. भंडारा सशर्त देखील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.