दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सुरू झालेल्या दोन चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले तर दोन जवान शहीद झाले. पहिली चकमक कुलगाम जिल्ह्यातील चिन्निगाम भागात झाली. या चकमकीत ४ दहशतवादी मारले गेले तर एका जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी चिन्निगाम भागात आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. कुलगाम जिल्ह्यातील मुद्रघम भागात झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. या भागात अजूनही दहशतवादी लपून बसले आहेत. मुद्रघममध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची आणि चिन्निघम फ्रिसलमध्ये आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात आज सकाळी लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. जवानांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईनंतर दहशतवादी घनदाट जंगलातून पळून गेले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन जम्मू-काश्मीरमध्ये सलग तीन दहशतवादी हल्ल्यांनंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले आहेत. वाढत्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यान, पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये सुमारे 40 परदेशी दहशतवादी उपस्थित असल्याचा एक गुप्तचर अहवाल धक्कादायक आहे, त्यानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा एकदा सीमा ओलांडण्याचा कट रचत असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दलांनी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.
गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट जम्मू सेक्टरच्या दक्षिणेकडील पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या भागात जवळपास 35-40 विदेशी दहशतवादी सक्रिय असून ते छोट्या-छोट्या टीममध्ये काम करत असल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये प्रत्येकी दोन-तीन दहशतवादी आहेत. गुप्तचर संस्था आणि जमिनीवर काम करणाऱ्या सैन्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांच्या संख्येचा अंदाज लावला गेला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीजीपी रश्मी रंजन स्वैन यांनी देखील पुष्टी केली आहे की नियंत्रण रेषेवर (एलओसी) लॉन्च पॅडवर सुमारे 60 ते 70 दहशतवादी ‘सक्रिय’ आहेत.