काल रात्रपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे.मूंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मुंबईची लाइफ लाईन समजली जाणारी मध्य रेल्वे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले असून पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झालेले दिसले.आजही मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरतीची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.पहाटे भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, शीव स्टेशन या ठिकाणी पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर सांताक्रुझ येथे अनेक परिसरात ३ ते ४ फ़ूट पाणी साचले आहे. मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे पावसाने ठप्प झाली आहे. तसेच सायन कुर्ला दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मुंबई मध्ये रस्ते मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली दिसून आली आहे. मुंबईचा पावसाचा फटका नेतेमंडळीनाही बसलेला दिसून आला. पावसाळी अधिवेशनाला जात असलेल्या मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना कुर्ला पोलिसांच्या बिट चौकीत वाहनांच्या कोंडीमुळे थांबावे लागले. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनाही महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून उतरत मित्राच्या गाडीतून विधानभवनाकडे रवाना व्हावे लागले आहे.