आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सकाळी 10.55 वाजता नवी दिल्लीहून मॉस्कोला रवाना झाले. पंतप्रधान आजपासून तीन दिवस रशिया आणि ऑस्ट्रियाच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निमंत्रणावरून 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान 8 आणि 9 जुलै रोजी मॉस्कोमध्ये असतील. यावेळी दोन्ही नेते दोन्ही देशांमधील सुरक्षितता, व्यापार, गुंतवणूक करार, उर्जा सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि विविध विभागातील नागरिकांचे परस्पर सहकार्य अशा द्विपक्षीय मुद्यावर चर्चा करतील आणि परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील.
यानंतर, पंतप्रधान ऑस्ट्रियाला भेट देतील, अशी माहिती भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) जारी केलेल्या माहितीनुसार दिली आहे. पंतप्रधान 9 आणि 10 जुलै रोजी ऑस्ट्रियामध्ये असतील. गेल्या 41 वर्षांतला भारतीय पंतप्रधानांचा केलेला हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन(Alexander Van der Bellen) यांची भेट घेतील तसेच ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी भारत आणि ऑस्ट्रियातील उद्योगपतींनाही संबोधित करतील. मॉस्कोसह व्हिएन्ना येथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
रशियामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. संरक्षण सौद्यांवर जगाचे लक्ष राहणार आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी तिसऱ्यांदा रशियाला जात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीवर चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी मॉस्कोला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, हेही महत्त्वाचे आहे.
रशियाचे अध्यक्षीय प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को दौऱ्यासाठी रशिया उत्सुक आहे. रशियाने ही भेट परस्पर संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधान आज सकाळी १०.५५ वाजता नवी दिल्लीहून मॉस्कोला रवाना होतील. त्यांचे विशेष विमान 5:20 वाजता Vnukovo-II विमानतळावर उतरेल. रात्री 9.30 ते 11.30 या वेळेत त्यांची पुतिन यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी दोन्ही नेते डिनरला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी 9 जुलै रोजी भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. इतर बैठकाही होणार आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी मॉस्कोहून ऑस्ट्रियाला रवाना होतील. ते 10 जुलैपर्यंत ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर असतील.