कोल्हापूर जवळचा किल्ले विशाळगड त्वरित अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी करीत रविवारी हजारो शिवभक्त कार्यकर्ते भर पावसात रस्त्यावर उतरले होते. महाआरती केल्यानंतर त्यांनी विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे; गडावर होणाऱ्या अतिक्रमणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे.
कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच त्यांनी विशाळगडावरील आतिक्रमणाविरोधात आक्रमक होत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ते म्हणाले आहेत की,13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगड इथं जाणार आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही. मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर राजसदरेवरून सांगितलं होते की, सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, कुठंतरी भूमिका घेतलीच पाहिजे. असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण हे मोठं संकट आहे. ते अतिक्रमण सरकारने हटवावे अशी शिवभक्तांची आणि राज्यातील जनतेची मागणी आहे. तत्पूर्वी मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार विशाळगडावर १५६ अतिक्रमण केलेल्या जागा असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान संभाजीराजे यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक राजकारण्यांनी आणलेल्या अडथळ्यामुळे शासनाकडून या कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे.