उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल रात्री भूकंपाच्या सौम्य धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.5 इतकी मोजली गेली. रात्री ९.०९ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. देवभूमीत अचानक झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर खाली होता.
उत्तराखंड हा भाग भूकंप झोन पाचमध्ये येतो आणि येथे अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग,धारचुला, मुन्सियारी हे भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहेत. या भागात पृथ्वीच्या खाली दहा ते २५ किलोमीटर खोलवर भूकंप होत असतात असे सांगितले जाते. , उत्तराखंडमध्ये भविष्यात कधीही मोठा भूकंप होण्याची भीती शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे.
काहीच दिवसापूर्वी लेह-लडाख मध्येही भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली होती.