राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असली तरी त्यानंतरसुध्दा ही योजना सुरू राहणार आहे. शेवटच्या लाडक्या बहिणी पर्यंत या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात, महिलांसाठी तसेच इतर योजनांचा जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर आदी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चा लाभ मिळवून देण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास 7 लक्ष पात्र लाभार्थ्यांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो. त्यासाठी प्रशासनासोबतच सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळण्यासाठी राज्य शासनाने अनेक अटी शिथील केल्या आहेत. तरीसुध्दा विनाकारण गर्दी वाढत आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2024 नंतरही सुरू राहणार आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे अनिवार्य आहे, कारण दरमहा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 46 हजार कोटींची तरतूद केली आहे.