पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच काल मुंबईच्या वरळी येथे देखील पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती घडली आहे. तसेच आज पुण्यात देखील हिट अँड रनचे प्रकरण घडलं आहे. वरळी येथील अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्याला व गाडीच्या चालकाला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही सोडले जाणार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
शिवसेनेचे उपनेते राज शाह यांचा मुलगा मिहीर शहा याने वरळी येथे बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरून चाललेल्या एका कटुंबाला धडक दिली. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी मध्यरात्री झालेल्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात एका अज्ञात वाहनाने पोलिसांना चिरडलं आहे. त्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला असून, जखमी पोलिसावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”हिट अँड रन प्रकरणातील गुन्हेगारांविरुद्ध कोणत्याही प्रकारची सहिष्णुता दाखवली जाणार नाही. मी मुख्यमंत्री असेपर्यंत राजकारणी असोत, त्यांची मुले असोत किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असोत, कोणालाही सोडलं जाणार नाही.”
”राज्यात घडत असलेल्या हिट अँड रन घटनांमध्ये वाढ होत असल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्थेत फेरफार करतात हे खूप असह्य आहे. माझं सरकार हे कदापि सहन करणार नाही. राज्य सरकार हिट अँड-रन प्रकरणातील आरोपींसाठी कठोर कायदे व शिक्षा लागू करत आहे.”
https://x.com/mieknathshinde/status/1810228071741448353?s=08
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी व पुण्यातील अपघातांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर येथे पोर्शे कारने दोन जणांना उडवलं होते. गाडी किती वेगात होती याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. त्यानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पोर्शे कार अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आई-वडील अजूनही तुरुंगातच आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी अजूनही सुरुच आहे. दरम्यान आरोपीच्या आत्याने पुणे पोलीस व बालहक्क मंडळाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला पुन्हा केलेली अटक चुकीची होती असे म्हणत आरोपीला तात्काळ तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यात आला आहे.